दुकानदाराचा परफेक्ट प्लॅन, चार महिन्यात आठ जणांना संपवलं, नववी हत्या करतानाच...

मुंबई तक

एका दुकानदाराने चार महिन्यांच्या कालावधीत आठ जणांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. छत्तीसगड मधील या घटनेने चांगलीच खळबळ उडाली. या हत्यांमागे नेमकं काय कारण आहे, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

दुकानदाराचा परफेक्ट प्लॅन,

point

चार महिन्यात आठ जणांना संपवलं,

point

नववी हत्या करतानाच...

Crime News : छत्तीसगडमधील बलोदाबाजार जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका दुकानदारावर अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत तब्बल आठ जणांची हत्या केल्याचा गंभीर आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम सहाय जायसवाल (46) असे या संशयित आरोपीचे नाव असून, त्याने दारूमध्ये विषारी (बोरेक्स) पावडर मिसळून एकापाठोपाठ एक आठ जणांना मृत्यूच्या दारात ढकलले. हा संपूर्ण प्रकार बलोदाबाजार जिल्ह्यातील खरवे गावात घडला असून, येथे फेब्रुवारी ते मे महिन्यादरम्यान एकामागून एक गूढ मृत्यू होत होते. आश्चर्यकारक बाब म्हणजे, हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पीडित कुटुंबांच्या सांत्वनासाठी जायचा आणि त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊन निष्पाप असल्याचा आव आणायचा. अखेर पोलिसांनी मंगळवारी (23 जून) या सायको किलरला अटक केली आहे.

'असं' बाहेर आलं प्रकरण

सुरुवातीला या मृत्यूंमागे आजारपण किंवा नैसर्गिक कारणे असावीत, असा समज गावकरी आणि नातेवाईकांचा झाला होता. मात्र, जसजसा वेळ गेला तसा गावकऱ्यांचा संशय बळावला. मृत पावलेले सर्वजण मृत्यूपूर्वी राम सहाय याच्या संपर्कात आले होते, अशी माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. पोलिसांनी 14 मे रोजी मृत्यू झालेल्या महेतरू साहू नावाच्या व्यक्तीचा मृतदेह 13 जून रोजी थडग्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर संशय बळावल्याने आणखी 6 मृतदेह जमिनीतून बाहेर काढून रायपूरमधील रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले. तर बुधराम जायसवाल नावाच्या एका मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यामुळे त्याचा मृतदेह पोलिसांना मिळू शकला नाही. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती. तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे, तसेच गावात केलेल्या चौकशीत आरोपीने उंदीर मारण्याच्या बहाण्याने एका गावकऱ्याकडून बोरेक्स पावडर घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने आपला गुन्हा कबूल केला.

हे ही वाचा : मुंबई : लोकलमध्ये किरकोळ वाद, तरण्याबांड मुलाचा खून, आईने हंबरडा फोडला

का केले खून?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने या विषारी पदार्थाची पहिली चाचणी एका कुत्र्यावर केली होती. कुत्र्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्याने 6 फेब्रुवारी रोजी बद्री नावाच्या व्यक्तीला विषारी दारू पाजून पहिली हत्या केली, ज्याच्याशी त्याचे वारंवार भांडण होत असे. यानंतर 20 फेब्रुवारीला जुन्या वादातून त्याने बुथालूला लक्ष्य केले. 12 मार्चला छत्तूराम नावाच्या व्यक्तीवर आपल्या पत्नीबाबत वाईट नजर असल्याचा संशय आल्याने त्याने त्याला विष दिले. 20 मार्च रोजी जमिनीच्या वादातून बुधरामची हत्या करण्यात आली. यानंतर 31 मार्च रोजी विनोद कुमार आणि 28 एप्रिल रोजी गजानंद यांची हत्या करण्यात आली; गजानंद आपल्यावर करणी करत असल्याचा संशय आरोपीला होता. 29 एप्रिल रोजी चैतूराम नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली, ज्याच्याकडून आरोपीने 50 हजार रुपये कर्ज घेतले होते आणि त्याला व्याजाचे पैसे द्यायचे नव्हते. या साखळीतील शेवटचा बळी 14 मे रोजी महेतरू राम ठरला.

हे ही वाचा : लग्नसोहळ्याची तयारी सुरू होती, नवरी मुलीसह आई वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, अश्लील फोटो अन्..

एकजण सुदैवाने वाचला

आरोपीने नऊ जणांना मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कार्तिक नावाचा एक व्यक्ती यातून सुदैवाने बचावला. विषारी दारू प्यायल्यानंतर प्रकृती बिघडताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचे प्राण वाचले. नंतर कार्तिकनेच पोलिसांना सांगितले की, त्याला ती दारू राम सहायने दिली होती, ज्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. आरोपी गुन्ह्यानंतर पीडित कुटुंबांना मदत करायचा, आजारी लोकांना रुग्णालयात नेण्यात मदत करायचा आणि अंत्यसंस्कारातही आघाडीवर असायचा, ज्यामुळे दीर्घकाळ कोणालाही त्याच्यावर संशय आला नाही. सध्या पोलिसांनी आरोपीविरुद्ध आठ हत्या आणि एका हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हे वाचलं का?