'तिनं दुसऱ्यावर प्रेम करावं, हा विचारच मला सहन होत नव्हता..' तरुणीवर कॉलेजमध्येच सपासप वार
मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या कशिश नावाच्या 20 वर्षीय विद्यार्थिनीची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. तिच्यासोबत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानेच ही हत्या केली. उत्तर प्रदेशातील ही घटना नेमकी काय आहे, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'तिनं दुसऱ्यावर प्रेम करावं, हे मला सहन होत नव्हतं..'
तरुणीवर कॉलेजमध्येच सपासप वार
Crime News : एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या कशिश नावाच्या 20 वर्षीय विद्यार्थिनीची तिच्याच कॉलेजमधील सागर सिंग या सहकाऱ्याने चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. 14 जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास कशिश सिटी स्कॅन रूममध्ये एकटी असताना सागर तिथे पोहोचला. त्याने सुरुवातीला तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर सागरने त्याच्या बॅगेत लपवून ठेवलेला 12 इंचाचा मोठा चाकू काढला आणि कशिशच्या छातीवर व पोटावर सपासप वार केले. तिला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या एका नर्सवरही त्याने हल्ला केला. उपचारादरम्यान कशिशचा मृत्यू झाला असून, नर्सवर सध्या उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशातील पिलभीत शहरातील ही घटना आहे.
लग्नाची मागणी, नकार अन् हत्या
घटनेनंतर कॉलेजमधील इतर कर्मचाऱ्यांनी सागरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चौकशी केली असता सागरने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की, तो गेल्या एका आठवड्यापासून कशिशला मनवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु ती सतत त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. हा नकार तो सहन करू शकला नाही, म्हणूनच त्याने कशिशला मारण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने चार दिवसांपूर्वीच एक मोठा चाकू विकत घेतला होता. हल्ल्याच्या दिवशीही कशिशने त्याचे तोंड बघणे टाळले आणि ती तिथून पळून जाऊ लागली, ज्यामुळे अधिक भडकलेल्या सागरने तिला पकडून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. 'तिनं दुसऱ्यावर प्रेम करावं, हा विचारच मला सहन होत नव्हता' असं आरोपीनं सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने कशिशकडे लग्नाची मागणी घातली होती. मात्र कशिशने यासाठी नकार दिला होता.
हे ही वाचा : बांगड्या भरल्या, लिपस्टिक लावली अन् मेकअप.., छेड काढणाऱ्या 'रोमिओ'ला तरुणीने शिकवला धडा VIDEO
आरोपी करायचा नीटची तयारी
सागर हा डॉक्टर होण्यासाठी नीट (NEET) परीक्षेची तयारी करत होता. काही दिवसांपूर्वीच तो परीक्षेच्या तयारीसाठी आपल्या गावी गेला होता, मात्र कशिशच्या विचाराने तो अवघ्या एका दिवसातच पिलभीतला परतला. सागरच्या कुटुंबीयांना त्याच्या या एकतर्फी प्रेमाबद्दल किंवा तो असे काही पाऊल उचलणार आहे याबद्दल कोणतीही कल्पना नव्हती. कशिश दुसऱ्या कोणाची होऊ नये आणि तिने आपल्याला दिलेला नकार या मानसिकतेतून सागरने हे टोकाचे पाऊल उचलले. शिक्षण पूर्ण व्हायचे असताना आणि हातात वेळ असतानाही, केवळ रागाच्या आणि एकतर्फी प्रेमाच्या भरात त्याने हे क्रूर कृत्य केले.
हे ही वाचा : सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उचललं, मला मारहाण झाली; दिपकेंचे आरोप अन् पोलिसांचं स्पष्टीकरण
कॉलेज प्रशानाचा निष्काळजीपणा
या संपूर्ण प्रकरणात कॉलेज प्रशासनाचा अत्यंत निष्काळजीपणाही समोर आला आहे. सागर सतत पाठलाग करतो आणि त्रास देतो, अशी लेखी तक्रार कशिशने काही दिवसांपूर्वीच कॉलेजच्या प्राचार्यांकडे केली होती. मात्र, प्राचार्यांनी या गंभीर तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि कोणतीही कारवाई केली नाही. जर वेळीच प्राचार्यांनी सागरवर कायदेशीर किंवा शिस्तभंगविषयक कारवाई केली असती, तर आज कशिशचा जीव वाचला असता. या दुर्दैवी घटनेमुळे एकतर्फी प्रेमातून विकृत मानसिकतेकडे जाणाऱ्या तरुणांचा प्रश्न आणि महिलांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाची अनास्था पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.










