Weather Report : विदर्भासह कुठल्या भागांमध्ये मुसळधार पाऊस? काय अंदाज?
महाराष्ट्रात पावसाचं चित्र पुन्हा बदलत असून भारतीय हवामान विभागाने (IMD) विकेंडसाठी ताजा हवामान अंदाज जाहीर केला आहे. राज्यातील कोणत्या भागात पावसाच्या सरी बरसणार, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Weather Report
विदर्भासह कुठल्या भागांमध्ये मुसळधार पाऊस?
काय अंदाज?
Weather Report : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि तिथून येणाऱ्या आर्द्रतेमुळे हवामानात मोठे बदल झाले आहेत. हे कमी दाबाचे क्षेत्र आधी बंगाल, झारखंड आणि ओडिसा पार करून आता भारताच्या अंतर्गत भागात सरकले आहे. याचा थेट परिणाम म्हणून येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये, विशेषतः विदर्भासह मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने सुरुवात होऊन नंतर त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट
प्रादेशिक पातळीवर पावसाचा अंदाज पाहिला तर विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची सर्वाधिक शक्यता आहे. सॅटेलाईट इमेजच्या निरीक्षणानुसार नागपूरच्या आसपासच्या परिसरात दाट ढगांची निर्मिती झाली असून मान्सूनचे वारेही सक्रिय झाले आहेत. दुसरीकडे, अरबी समुद्रातही किनारपट्टीच्या भागात काही प्रमाणात ढग जमा होऊ लागले आहेत. बंगालच्या उपसागरातील घडामोडींचा हा परिणाम आहे. यामुळे कोकण, सिंधुदुर्ग आणि रायगड या किनारपट्टीच्या भागात पुढील दोन दिवसांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. शनिवारी म्हणजेच 18 जुलै रोजी विदर्भातील अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, लातूर, बीड आणि अहिल्यानगरसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांनाही 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
हे ही वाचा : समजून घ्या: डीलिमिटेशनमध्ये मतदारसंघ असे काही बदलले की काँग्रेसचा विश्वासच राहिला नाही?
विदर्भात जोरदार पावासासाठी अनुकूल परिस्थिती
रविवार म्हणजेच 19 जुलै रोजीही पावसाचा हा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. या दिवशी पुण्याचा घाट परिसर, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली या भागांसह विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने 'येलो अलर्ट' कायम ठेवला आहे. यापूर्वी 17 जुलै रोजी कोकणातील काही भाग आणि मुंबईत तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, परंतु 18 आणि 19 जुलैला मात्र विदर्भात जोरदार पावसासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
हे ही वाचा : 'रामरक्षा काय रामदास कदमच्या बापाने लिहिली, ढुं#&% सोडून चोऱ्या...', पेडणेकरांचा रुद्रावतार!
ऑगस्टचे पहिले 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे
हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वत्र सारखा पाऊस झालेला नाही. कोकण आणि गोव्यात पावसाचे प्रमाण सरासरी म्हणजेच नॉर्मल रेंजमध्ये आहे, तर पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा केवळ 4 टक्के जास्त पाऊस झाला आहे. याउलट, विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र पावसाची मोठी तूट आहे. विदर्भात 330 मिमी पावसाची अपेक्षा असताना केवळ 210 मिमी पाऊस पडल्याने 36 टक्के कमतरता आहे, तर मराठवाड्यात 217.1 मिमी ऐवजी केवळ 131 मिमी पाऊस झाल्याने 39 टक्के कमतरता नोंदवली गेली आहे. त्यामुळे येथील शेतीसाठी जुलैचे उर्वरित 15 दिवस आणि ऑगस्टचे पहिले 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, आगामी दोन दिवसांचा पाऊस शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देणारा ठरू शकतो.










