'चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का?..' राज ठाकरेंचा मोदींना सवाल, नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आर्थिक शिस्त आणि काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. त्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत भाष्य केले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का?..
राज ठाकरेंचे मोदींना सवाल
नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray On Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आर्थिक शिस्त आणि काटकसर करण्याचे आवाहन केले होते. आधी हैदराबाद येथे आणि नंतर गुजरातमध्ये त्यांनी हे आवाहन आहे. यामध्ये वर्षभर सोने खरेदी करु नका, पेट्रोल-डिझेलची बचत करा, वर्क फ्रॉम होम करा, परदेश दौरे टाळा अशा आवाहनांचा समावेश आहे. यावर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही मूलभूत प्रश्न उपस्थित करत सरकारला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी
सस्नेह जय महाराष्ट्र,
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्कफ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा इत्यादी इत्यादी. हे सगळं का ? तर, सोनं, पेट्रोल डिझेल हे आयात करावं लागतं आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणवर खर्च होते. आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढलेत.
बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत त्याचं काय करणार आहात आपण ? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, यापुढे माझ्यासकट कोणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का ? चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का?









