Lok Sabha Election 2024 : भाजपचं चार घटकांवर लक्ष! PM मोदींनी लोकसभा निवडणुकीचा अजेंडा केला सेट

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Lok Sabha Election, PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये भारतीय जनता पक्षाच्या (BJP) बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी काही मुद्द्यांवर बोट ठेवत विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदींच्या संपूर्ण भाषणात गाव, शेतकरी, मुस्लिम, भ्रष्टाचार, समान नागरी कायदा यावरच भर राहिला. मोदींच्या या चार घटकांचा आता निवडणुकीच्या अनुषंगाने अर्थ काढले जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवरून विरोधी पक्षांवर निशाणा साधत तुम्हाला तुमच्या मुला-मुलींची काळजी वाटत असेल, तर भाजपला मतदान करा, असे आवाहन केले. घराणेशाही आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांना घेरले. तसेच युद्धाच्या काळातही महागाई नियंत्रणात असल्याचा दावा त्यांनी केला. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात दोनदा कपात केल्याचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला आणि विरोधक विनाकारण सरकारवर टीका करत असल्याचा आरोप केला.

आयुष्मान भारत योजना आणि जेनेरिक औषधांच्या दुकानांमुळे लोकांकडून होणाऱ्या बचतीचे आकडेही पंतप्रधान मोदींनी सांगितले. पीएम मोदींनी कल्याणकारी योजनांबाबत लोकांमध्ये जाण्याचा संदेश दिला. पंतप्रधानांच्या संपूर्ण भाषण बघितले तर त्यात गावांचा विकास, शेतकरी कल्याण, मुस्लिम, भ्रष्टाचार आणि समान नागरी कायदा हेच केंद्रस्थानी राहिले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ग्रामीण मतदारांवर लक्ष

2047 पर्यंत गावांचा विकास होईल तेव्हाच भारताचा विकास होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांबाबत ते म्हणाले की, आमचा उद्देश एका योजनेचा लाभ कोणत्याही लाभार्थ्याला देणे नसून 100 टक्के सगळ्यांना देणे हा आहे. नागरिकांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळण्याचा अधिकार आहे, ज्यासाठी तो पात्र आहे. पंतप्रधानांनी बूथ कार्यकर्त्यांना लाभार्थी कोणत्या योजनांसाठी पात्र आहे, हे पाहण्यासही सांगितले. यातून जनतेची सेवा होईल तसेच भाजपचे कामही होईल, असं ते सूचक बोलले.

हेही वाचा >> महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भुरळ घालणारं KCR यांचं विकासाचं Telangana Model काय?

पंतप्रधान मोदींच्या गावावर लक्ष केंद्रित करण्यामागे राजकीय विश्लेषक प्रामुख्याने तीन अंगांनी विचार करत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या गावांमध्ये जास्त आहे. दुसरे म्हणजे, एकेकाळी शहरी पक्ष समजल्या जाणाऱ्या भाजपने 2014 च्या निवडणुकीपासून ग्रामीण भागात सातत्याने चांगली कामगिरी केली आहे आणि ती कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तिसरे कारण म्हणजे ग्रामीण भागात लोकसभेच्या जागा जास्त असून, जिंकायच्या असल्यास ग्रामीण मतदार हा प्रमुख घटक आहे.

ADVERTISEMENT

राजकीय विश्लेषक अमिताभ तिवारी म्हणतात की, 543 सदस्यांच्या लोकसभेत अर्ध्याहून अधिक (सुमारे 300) जागा ग्रामीण भागातील आहेत. निमशहरी भागातील जागांचाही समावेश केला, तर अशा जागांची संख्या 350 पेक्षा जास्त होईल. देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या खेड्यांमध्ये राहते. कोणत्याही पक्षाला सत्तेवर आणण्यात किंवा सत्तेतून दूर करण्यात ग्रामीण मतदारांची निर्णायक भूमिका असते. 2014 च्या निवडणुकीपासून भाजपमध्ये सामील झालेल्या ग्रामीण मतदारांना टिकवून ठेवण्यासाठी पंतप्रधान मोदींचे गावांवर लक्ष केंद्रित करणे हा त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> PM मोदींनी टाकला डाव’! 85 टक्के व्होट बँक असलेले पसमांदा मुस्लिम कोण?

ते पुढे म्हणतात की, विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या भाजपच्या रणनीतीमध्ये सरकारी योजनांचे लाभार्थी महत्त्वाचे आहेत. आयुष्मान भारत ते मोफत रेशन आणि उज्ज्वला या केंद्राच्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या लाभार्थ्यांची संख्याही ग्रामीण भागात जास्त आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधानांचा संदेश स्पष्ट आहे, 2024 च्या निवडणुकीत भाजपचे लक्ष ग्रामीण जागांवर आणि ग्रामीण मतदारांवर असेल.

शेतकऱ्यांना साद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा अनेकदा उल्लेख केला. किसान सन्मान निधी ते पीक विमा योजनेबाबत बोलताना पीएम मोदींनी सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांची माहिती दिली आणि विरोधी पक्ष काँग्रेसवरही हल्लाबोल केला. विरोधकांवर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसचं एकच धोरण आहे. आधी शेतकर्‍यांना अडचणीत येऊ द्यायचं आणि मग कर्जमाफीच्या नावाखाली खोटे बोलून मतांचे पीक घ्यायचे.

हेही वाचा >> Narendra Modi Speech : उद्धव ठाकरेंसाठी भाजपचे दरवाजे अजूनही खुले आहेत?

मोदींचं हे विधान शेतकऱ्यांची नाराजी आणि काँग्रेसचे कर्जमाफीचे आश्वासन दूर करण्याच्या प्रयत्नांचा हा भाग असल्याचे म्हटले जात आहे. मध्य प्रदेशसारख्या राज्यात सरकार सरकार आल्यास कर्जमाफी करू असे आश्वासन काँग्रेसकडून दिले जात आहे. एमएसपी कायद्याबाबतही शेतकरी सरकारवर नाराज आहेत. तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले होते आणि प्रदीर्घ आंदोलनानंतर केंद्र सरकारला हे कायदे मागे घ्यावे लागले. लोकसभा निवडणुकीत शेतकरी बिथरले तर भाजपसाठी सत्तेचा मार्ग अवघड होऊ शकतो आणि हे लक्षात घेऊन पीएम मोदींनी आता शेतकऱ्यांना जुन्या दिवसांची आठवण करून दिली आहे, तसेच त्यांच्या सरकारने केलेल्या उपाययोजनांवर जोर दिला आहे.

मुस्लिम व्होटबँक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिमांबद्दल बोलून पसमांदा मुस्लिमांच्या स्थितीचा उल्लेख केला. तिहेरी तलाकच्या बाजूने बोलणाऱ्यांचाही पंतप्रधान मोदींनी समाचार घेतला आणि व्होटबँकेचे भुकेले लोक मुस्लिम मुलींवर अन्याय करत असल्याचे म्हटले. जर तिहेरी तलाक हा इस्लामचा अत्यावश्यक भाग असेल तर कतार, जॉर्डन, इंडोनेशिया सारख्या देशांनी तो का बंद केला? असा सवाल मोदींनी केला.

पंतप्रधान मोदींच्या पसमांदा मुस्लिम, तिहेरी तलाकवर लक्ष केंद्रित करण्याबाबत ज्येष्ठ पत्रकार डॉ. श्रीराम त्रिपाठी म्हणतात की, भाजप आता आपल्या कट्टर हिंदुत्वाच्या प्रतिमेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. मुस्लिम समाजात उपेक्षित, पसमांदा मुस्लिम भाजपच्या रणनीतीच्या केंद्रस्थानी आहेत. हिंदुत्वाच्या नावाखाली जे हिंदू एकत्र येऊ शकले असते ते सगळे आले असावेत, असा पक्ष बहुधा समजत आहे. आता काही निसटू शकतात आणि अशा स्थितीत काही पसमांदा मुस्लिमही एकत्र आले तर भाजपसाठी आणखी सोप्प होईल.

समान नागरी कायदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही समान नागरी कायद्याबाबत उघडपणे बोलून विरोधक भडकावत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, भारतातील मुस्लिम बांधवांना भडकवून कोणते राजकीय पक्ष राजकीय फायदा घेत आहेत, हे समजून घेतले पाहिजे. UCC आणण्याचे संकेत देताना पंतप्रधान म्हणाले की, जर घरातील एका सदस्यासाठी एक कायदा असेल आणि दुसऱ्यासाठी दुसरा कायदा असेल तर घर चालेल का? अशा दुहेरी व्यवस्थेत देश कसा चालणार?

समान नागरी कायदा आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालय वारंवार सांगत आहे, असेही ते म्हणाले. पीएम मोदींचे हे विधान 2024 च्या निवडणुकीत हा मोठा मुद्दा बनू शकतो याचे संकेत मानले जात आहे. मात्र, राममंदिर किंवा जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवणे यासारख्या मुद्द्यांवर मते मिळवण्यात कितपत यशस्वी होईल? हा मोठा प्रश्न आहे.

भ्रष्टाचारावरून विरोधकांना घेरणार, पण चालणार का?

विरोधकांच्या ऐक्याबाबत पाटणा येथे झालेल्या बैठकीची पंतप्रधान मोदींनी खिल्ली उडवली. भ्रष्टाचार आणि निवडणुकीपूर्वी हमीभाव देण्यावरूनही पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. पाटणा येथे जमलेल्या पक्षांवर हल्लाबोल करताना पंतप्रधान म्हणाले की, हे सर्व विरोधी पक्ष भ्रष्टाचार आणि लाखो कोटींच्या घोटाळ्यांची हमी आहेत. काही दिवसांपूर्वी एक ‘फोटो ऑप’ कार्यक्रम झाला. त्या फोटोतील सर्व लोकांची एकूण संख्या घेतली, तर २० लाख कोटी रुपयांचा घोटाळा होण्याची हमी आहे. एकट्या काँग्रेसचा लाखो कोटींचा घोटाळा आहे.

पंतप्रधान टूजी ते कोळशापर्यंत यूपीए सरकारच्या घोटाळ्यांची यादीही मोजली गेली. आपल्या बाजूने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कारवाईची हमी देताना, पंतप्रधान असेही म्हणाले की काही लोकांना फक्त आपल्या पक्षाचे भले करायचे आहे कारण त्यांना कमिशनचा वाटा मिळतो, पैसा मिळतो. हा तुष्टीकरणाचा मार्ग आहे. आमचे प्राधान्य देश आहे.

हेही वाचा >> NCP चे 70 हजार कोटींचे घोटाळे, सुप्रिया सुळे…, PM मोदींचा शरद पवारांवर पहिला ‘वार’

एनडीएचा सामना करण्यासाठी विरोधक मैदानात उतरले तर भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला धार देण्याची, निवडणुकीला तुष्टीकरण विरुद्ध सर्वसमान असे स्वरूप देण्याची रणनीती भाजप स्वीकारेल अवलंबेल, त्याचीच झलक मोदींच्या भाषणात बघायला मिळाली आहे.

मात्र, गेल्या 10 वर्षांपासून केंद्रात भाजपचेच सरकार आहे. अशा स्थितीत 2024 च्या निवडणुकीत भाजपसाठी भ्रष्टाचाराचा मुद्दा कितपत प्रभावी ठरेल? हा देखील पाहण्यासारखा मुद्दा असेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT