महाराष्ट्र : पैसा, प्लॉट अन् घर गेलं, आईची आत्महत्या, शहीदपुत्राची कहाणी, नोकरीसाठी 2 कोटींची फसवणूक
Gadchiroli Crime News : गडचिरोलीत नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या मुलाची उपजिलाधिकारी बनवण्याच्या नावाखाली 2 कोटींची फसवणूक झाली असून, या धक्क्याने शहीद पत्नीने आत्महत्या केली आहे. या रॅकेटमधील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य चार जणांचा शोध सुरू आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्र : पैसा, प्लॉट अन् घर गेलं, आईची आत्महत्या
शहीदपुत्राची कहाणी, नोकरीसाठी 2 कोटींची फसवणूक
Gadchiroli Crime News, व्यंकटेश दुडमवार :गडचिरोली येथील दुर्गानगर भागात राहणाऱ्या सागर मडावी या शहीद पुत्राची पुण्यातील एका टोळीने उपजिलाधिकारी बनवण्याचे आमिष दाखवून तब्बल 2 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. सागरचे वडील गणपत मडावी हे 2013 मध्ये एटापल्ली येथे नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. वडिलांच्या बलिदानानंतर सागरने मिळालेली आर्थिक मदत आणि कुटुंबाची सर्व बचत अधिकारी बनण्याच्या स्वप्नासाठी पणाला लावली गेली. मात्र, या फसवणुकीमुळे केवळ पैसाच गेला नाही, तर राहते घर आणि जमिनीही विकाव्या लागल्या. या सर्व प्रकारामुळे आणि आर्थिक विवंचनेमुळे झालेल्या मानसिक धक्क्यातून सागरची आई मीनाबाई मडावी यांनी 4 जानेवारी 2026 रोजी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. एका हसत्या-खेळत्या शहीद कुटुंबाची या फसवणुकीमुळे पूर्णपणे राखरांगोळी झाली आहे.
मंत्रालयातील ओळखीचे आमिष आणि सर्वस्व गमावलेला शहीद पुत्र
पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना सागरची भेट ज्ञानेश्वर वरे याच्याशी झाली होती. वरे याने मंत्रालयात मोठी ओळख असल्याचे सांगून सागरला थेट उपजिलाधिकारी बनवण्याचे आश्वासन दिले. ठगांच्या या जाळ्यात अडकलेल्या सागरने आपल्या वडिलांच्या बलिदानानंतर मिळालेली सरकारी मदत, घरातील दागिने, गडचिरोली आणि एटापल्ली येथील मौल्यवान प्लॉट आणि शेवटी राहते घरही विकले. इतकेच नाही तर त्याने आपली एलआयसी पॉलिसी देखील मोडून सर्व पैसे या टोळीला दिले. एकूण २ कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिल्यानंतरही नोकरी मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर सागरने पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्याकडे तक्रार केली. एका शहीद कुटुंबाला रस्त्यावर आणणाऱ्या या टोळीच्या क्रूरतेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
हेही वाचा : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे काम सुरु, नियोजित वेळेसाठी वाहतूक सेवा बंद
मुख्य सूत्रधार पोलीस कोठडीत; अन्य चार आरोपींचा शोध सुरू
गडचिरोली पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर शिवाजी वरे (रा. भोर, पुणे) याला अटक केली असून २१ एप्रिल रोजी न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीत स्वतःला मंत्रालयातील मोठा अधिकारी सांगणारा 'महाजन' नावाचा व्यक्ती आणि अजय भगत, मुकेश यादव, संदीप कुमार यांचा समावेश आहे. हे चारही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या टोळीने सागरसोबतच त्याच्या भावंडांनाही सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लुटले होते. या फसवणुकीच्या रॅकेटचे धागेदोरे कुठेपर्यंत पसरले आहेत आणि त्यांनी अजून किती तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे, याचा सखोल तपास आता गडचिरोली पोलीस करत आहेत.









