'मी नेहमी क्लीनचीट देत नाही, जो क्लीन असतो त्यालाच..', अशोक खरात प्रकरणावर देवेंद्र फडणवीस विधानसभेत थेट बोलले
Devendra Fadnavis on Ashok Kharat case : नाशकातील भोंदूबाब अशोक खरात याच्या कृत्याबाबत मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाष्य केलं. शिवाय, पोलीस चौकशी सुरु असून याबाबत उद्या सविस्तरपणे सभागृहात निवेदन करेन, असंही फडणवीसांनी सांगितलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'मी नेहमी क्लीनचीट देत नाही, जो क्लीन असतो त्यालाच..',
देवेंद्र फडणवीस अशोक खरात प्रकरणावर थेट बोलले
Devendra Fadnavis on Ashok Kharat case, मुंबई : गेल्या 4 ते 5 दिवसांपासून राज्यभरात नराधम भोंदूबाबा अशोक खरात याच्याबाबत राज्यभरात चर्चा सुरु आहे. अघोरी कृत्य आणि अंधश्रद्धा पसरवून तसेच सापाची भीती दाखवून त्याने लोकांची फसवणूक केल्याचं समोर आलंय. तर अनेक शिवाय पूजा करण्याच्या बहाण्याने अनेक महिलांचं शोषण देखील केलंय. या प्रकरणात खरातविरोधात तीन महिलांनी तक्रार दाखल केली आहे. शिवाय तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून एसआयटी देखील नेमण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आज (दि.23) अशोक प्रकरणावर भाष्य केलंय. ते काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊयात...
हेही वाचा : साताऱ्याच्या ZP राड्यानंतर एकनाथ शिंदे विधानसभेत आक्रमक, देवेंद्र फडणवीसांचा तातडीने मोठा निर्णय
महिलांचं ब्रेन वॉशिंग करण्यात आलं, मी सभागृहात सविस्तर निवेदन करणार - फडणवीस
देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलताना म्हणाले, "अध्यक्ष महोदय.., माननीय विरोधी पक्षाच्या वतीने जो मुद्दा उपस्थित झाला. तथाकथित तांत्रिक-मांत्रिक बाबा जे काही असतील.. भोंदूबाबा अशोक खरातचा विषय जो घडलेला आहे, तो अतिशय गंभीर आहे. या व्यक्तीने आपल्या तथाकथित शक्तींचा दुरुपयोग करुन दिशाभूल करुन अनेक महिलांसोबत गैरव्यवहार आणि दुष्कृत्य केल्याचं समोर येत आहे. या संदर्भात मी सभागृहाला अवगत करु इच्छितो की, आपल्या पोलिसांनी या संदर्भात प्रोअॅक्टिव्हली कारवाई केली आहे. याचा ट्रॅप तयार करुन कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये महिलांची फसवणूकच झाली होती. त्या समोर यायला तयार नव्हत्या. त्यांना योग्य पद्धतीने धीर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर काही महिलांनी तक्रार देण्यात आली आहे. उर्वरीत आणखी काही महिला यासंदर्भात तक्रार करतील. या संदर्भात कारवाई जरी आता झाली असली तरी याची तयारी अगोदर करण्यात आली होती. त्यांच्या अटकेच्या दहा दिवस अगोदर साधारण 10 तारखेला दुसऱ्या जिल्ह्यातून आपण एका तक्रारीचा उपयोग करुन त्यांचा LOC देखील काढून ठेवला होता. त्यांना बाहेर पळता येऊ नये, यासाठी हे करण्यात आले आहेत. मी या सभागृहात उद्या या प्रकरण्याचं डिटेल्ड निवेदन करेन, कारण या प्रकरणाची चौकशी अजूनही सुरु आहे. हा आपल्यासाठी राजकारणाचा विषय नाही. हा महिलांच्या डिग्नीटीचा विषय आहे. महिलांचा दुरुपयोग करणे, त्यांचं ब्रेन वॉशिंग देखील करण्यात आलं आहे. याचं गांभीर्ण लक्षात घेऊन मी उद्या सखोल निवेदन करेन.", असं फडणवीसांनी नमूद केलं.
'मी नेहमी क्लीनचीट देत नाही, जो क्लीन असतो त्यालाच क्लीनचीट मिळते'
दरम्यान, सभागृहात देवेंद्र फडणवीसांना समोरुन विरोधकांनी क्लीनचीटवरुन डिवचलेलं पाहायला मिळालं. त्यांना प्रत्युत्तर देताना म्हणाले, मी नेहमी क्लीनचीट देत नाही. जो क्लीन असतो त्यालाच क्लीनचीट मिळते. अशी कुठलीच चीट माझ्याकडे नाही. या प्रकरणात तर ज्याचा दुरान्वये संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.










