मुंबईची खबर : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! धरणांतील पाणीसाठा वाढला, पाणीकपात थांबणार?
मुंबई आणि आसपासच्या परिसर व धरण क्षेत्रात गेल्या 24 तासांत झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे मुंबईवरील संभाव्य पाणीसंकटाचे ढग बऱ्याच अंशी दूर झाले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईची खबर : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी!
धरणांतील पाणीसाठा वाढला
पाणीकपात थांबणार?
Mumbai News : मुंबई आणि आसपासच्या परिसर व धरण क्षेत्रात गेल्या 24 तासांत झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवार 20 जुलै ते मंगळवार 21 जुलैच्या 24 तासांच्या कालावधीत झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही महत्त्वाच्या जलाशयांच्या पाणीसाठ्यात तब्बल 3.70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या पावसामुळे सातही तलावांमधील एकूण उपयुक्त जलसाठा आता 57.75 टक्क्यांवर पोहोचला असून, मुंबईवरील संभाव्य पाणीसंकटाचे ढग बऱ्याच अंशी दूर झाले आहेत.
वाढत्या साठ्यामुळे दिलासा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हायड्रोलिक इंजिनिअर विभागाच्या भांडुप कॉम्प्लेक्स येथील मुख्य नियंत्रण कक्षाने दिलेल्या अधिकृत अहवालानुसार, सध्या सातही तलावांमध्ये एकूण 8,35,919 दशलक्ष लीटर (Useful Content) पाणीसाठा जमा झाला आहे. या जलप्रकल्पांची एकूण क्षमता 14,47,363 दशलक्ष लीटर इतकी आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये याच तारखेला तलावांमध्ये 82.65 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता, तर 2024 मध्ये तो 43.41 टक्के इतका होता. यंदाच्या वाढत्या साठ्यामुळे आगामी दिवसांत पालिकेला मोठा दिलासा मिळणार आहे.
हे ही वाचा : मोदींच्या निवासाबाहेर राहुल गांधींचं आंदोलन, आक्रमक घोषणाबाजी
किती पाऊस पडला?
गेल्या 24 तासांतील पावसाचा विचार केल्यास तानसा आणि भातसा धरण क्षेत्रात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तानसा धरण क्षेत्रात 105 मिमी, भातसा येथे 100 मिमी आणि अप्पर वैतरणा क्षेत्रात 96 मिमी पाऊस पडला आहे. तर मोडक सागर येथे 67 मिमी, मध्य वैतरणा येथे 44 मिमी, वेहार येथे 69 मिमी आणि तुळशी धरण क्षेत्रात 48 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे विविध धरणांच्या पातळीत एकाच दिवसात 0.08 मीटरपासून ते 1.38 मीटरपर्यंत (भातसा धरण) लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.
हे ही वाचा : मोदींना 'लेम डक' प्रेसिडेंटची उपमा, सरकारला म्हणाले मानसिक रुग्ण.. राज ठाकरेंची नवी फेसबुक पोस्ट पाहिली का?
तलावांमध्ये किती पाणीसाठा?
जलाशयांच्या सद्यस्थितीनुसार, मुंबईला पाणी पुरवणारे वेहार आणि तुळशी हे दोन्ही तलाव 100 टक्के भरले असून आधीच ओव्हरफ्लो (ओसंडून वाहू) झाले आहेत. 7 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता वेहार तलाव तर रात्री 11:43 वाजता तुळशी तलाव तुडुंब भरून वाहू लागले होते. याशिवाय तानसा तलावात 93.22 टक्के आणि मोडक सागर तलावात 86.18 टक्के पाणीसाठा झाला असून हे तलावही पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहेत. अप्पर वैतरणा (36.41%), मध्य वैतरणा (50.21%) आणि भातसा (52.16%) या धरणांमध्येही आवक सुरू असून, हवामान खात्याने पुढील काही दिवसांत असाच पाऊस कायम राहिल्यास पाणीसाठा आणखी वेगाने वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे.










