तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचं काळ्या फिती बांधून आंदोलन, नेमकं कारण काय?

मुंबई तक

तुळजाभवानी मंदिर प्रशासनासंबंधी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. प्रशासनाने काल काळ्या फिती बांधून दिवसभर कामबंद आंदोलन केलं. यामागे नेमकं कारण काय आहे, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Dharashiv News
Dharashiv News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचं काळ्या फिती बांधून आंदोलन

point

नेमकं कारण काय?

Dharashiv News, गणेश जाधव : तुळजाभवानी मंदिर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी (PRO) आणि सहाय्यक जनसंपर्क अधिकाऱ्यांना फोनवरून अर्वाच्य व अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी विजय विलास गंगणे याच्याविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या मंदिर परिसरात पुरातत्त्व विभागामार्फत जतन आणि संवर्धनाची कामे सुरू आहेत. या कामांतर्गत गोमुख तीर्थाजवळील भिंतीचे पाडकाम सुरू असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून वयोवृद्ध आणि दिव्यांग भाविकांसाठी उपलब्ध असलेली डोली (खुर्ची) सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली होती. याच मुद्द्यावरून वाद निर्माण होऊन ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

अश्लील भाषेत शिवीगाळ

मिळालेल्या माहितीनुसार, सुरज जगताप नावाच्या व्यक्तीने पुजारी कार्यालयात येऊन एका दिव्यांग भाविकासाठी डोलीची मागणी केली होती. त्यावेळी जनसंपर्क अधिकारी अभिजीत तेरखेडकर आणि सहाय्यक जनसंपर्क अधिकारी उमाकांत क्षीरसागर यांनी सुरक्षेच्या कारणास्तव ही सेवा तात्पुरती स्थगित असल्याचे स्पष्ट केले. यानंतर सुरज जगताप यांनी विजय विलास गंगणे यांना मोबाईलवर संपर्क साधून फोन उमाकांत क्षीरसागर यांच्याकडे दिला. फोनवर बोलताना विजय गंगणे यांनी डोली सेवा बंद ठेवल्याचा जाब विचारत दोन्ही अधिकाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला.

हे ही वाचा : शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, फोटो व्हायरल

मंदिर प्रशासनात लाट

या प्रकरणी जनसंपर्क अधिकारी अभिजीत अनंतराव तेरखेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिसांनी विजय विलास गंगणे (रा. तुळजापूर, जि. धाराशिव) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम 296 आणि 351(4) अन्वये एफआयआर नोंदवला आहे. मंदिर संस्थानच्या जबाबदार अधिकाऱ्यांशी झालेल्या या गैरवर्तनामुळे आणि मानसिक त्रासामुळे संपूर्ण मंदिर प्रशासनात संतापाची लाट पसरली आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी : जेपी नड्डा, जितेंद्र सिंह यांनी मध्यरात्रीच घेतली वांगचुक यांची भेट, नेमकं काय घडलं?

काळी फीत लावून कामबंद आंदोलन

या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी मंदिर संस्थानच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हाताला काळी फीत लावून दिवसभर कामबंद आंदोलन छेडले. आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. अधिकाऱ्यांना फोनवरून धमकावल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले असून, दोषींवर तातडीने व कठोर कायदेशीर कारवाई करण्याची ठाम मागणी मंदिर प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.

हे वाचलं का?