मुंबईतील ३३७ इमारती अतिधोकादायक; BMC ने यादीच केली जाहीर

मुंबई तक

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सी-१ श्रेणीतील अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या एकूण ३३७ इमारतींची यादी महानगरपालिकेनं जाहीर केली आहे. ही यादी महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.mcgm.gov.in यावर उपलब्ध आहे.

BMC declares 337 buildings as dangerous/aajtak

या ३३७ इमारतींपैकी मुंबई शहर विभागात ७०, पूर्व उपनगरे विभागात १०४ तर पश्चिम उपनगरे विभागात १६३ इमारती यादीत समाविष्ट आहेत. धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारीचा उपाययोजना म्हणून त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असं आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी केलं आहे.

BMC declares 337 buildings as dangerous

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळापूर्व विविध कामे आणि उपाययोजना केल्या जातात. नाल्यांमधून गाळ काढणे, रस्ते दुरुस्ती यांच्यासोबतच मुंबई महानगरातील निवासी घरांची आणि अनिवासी जागांची तपासणी करुन त्यांची धोकादायक आणि अतिधोकादायक श्रेणी निश्चित केली जाते.

full list of dangerous buildings in mumbai

यंदादेखील महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगरातील निवासी व अनिवासी इमारतींचे सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले.

तपासणीअंती काल (२५ एप्रिल २०२२) अंतिम केलेली सी-१ श्रेणीतील अतिधोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.mcgm.gov.in यावर ‘इतर संकेतस्थळं / Relevant Websites’ या सदरामध्ये ही यादी नागरिकांसाठी उपलब्ध आहे.

मुंबई शहर विभागात ७० इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. या ७० इमारतींमध्ये ए विभाग ४, बी विभाग ४, सी विभाग १, डी विभाग ४, ई विभाग १२, एफ/दक्षिण विभाग ५, एफ/उत्तर विभाग २६, जी/दक्षिण विभाग ४ आणि जी/उत्तर विभाग १० अशा विभागनिहाय इमारतींचा समावेश आहे.

पश्चिम उपनगरांचा विचार करता १६३ पैकी एच/पूर्व विभागात ९, एच/पश्चिममध्ये ३०, के/पूर्व विभागात २८, के/पश्चिम विभागात ४०, पी/दक्षिण विभागामध्ये ३, पी/उत्तर विभागात १३, आर/दक्षिण विभागात १०, आर/मध्य विभागामध्ये २२ आणि आर/उत्तर विभागात ८ इमारती सी-१ श्रेणीमध्ये समाविष्ट आहेत.

full list of dangerous buildings in mumbai

पूर्व उपनगरातील १०४ इमारतींपैकी एम/पश्चिम विभागात १६, एम/पूर्व विभागामध्ये १, एल विभागात १२, एन विभागात २०, एस विभागात ६ आणि टी विभागात ४९ इमारतींचा समावेश आहे.

full list of dangerous buildings in mumbai

या अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी नागरिकांनी त्वरित निवासस्थान रिक्त करावे, तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे तसेच सदर इमारत स्वतःहून मालकांनी निष्कासित करावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

full list of dangerous buildings in mumbai

बृहन्मुंबई क्षेत्रातील ज्या इमारती ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधीकरीता वापरात आहेत, अशा इमारतींची महानगरपालिका प्रशासनाकडे नोंदणीकृत असलेल्या संरचनात्मक अभियंत्यांद्वारे परीक्षण करुन घेणे अनिवार्य आहे. सदर यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

BMC declares 337 buildings as dangerous/aajtak