भारताची आघाडीची महिला स्प्रिंटर हिमा दासच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. हिमा आता आसाम पोलिसांमध्ये डीएसपी पदावर काम करणार आहे.
आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल व आसाम पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हिमा दासला आज नियुक्तीचं पत्र देण्यात आलं.
लहानपणापासून पोलीस अधिकारी बनण्याचं पाहिलेलं स्वप्न होत आज पूर्ण होत असल्याची भावना हिमा दासने यावेळी बोलून दाखवली.
यावेळी बोलत असताना लहानपणी जत्रेत आई आपल्याला एक बंदूक खरेदी करुन द्यायची…आपल्या मुलीने मोठं होऊन पोलीस अधिकारी व्हावं अशी आईची इच्छा होती. ती इच्छा आज पूर्ण झाल्याचंही हिमाने सांगितलं.
ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पिअनशीप, कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये हिमा दासने भारताला पदकं मिळवून दिली आहेत. आसामसारख्या छोट्या राज्यांतून आल्यानंतरही अत्यंत हालाकीच्या परिस्थितीचा सामना करत हिमाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाव मोठं केलं आहे.
खेळामुळे माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला. यापुढे राज्यातील खेळाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करेन असं हिमा दासने कार्यक्रमात आभार प्रदर्शन करताना सांगितलं.