'सावरकरांना आठवा, मी लवकरच येतो', ब्रिजभूषण यांना वाजपेयींनी तुरुंगात पाठवलं होतं पत्र

मुंबई तक

उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह हे महाराष्ट्रात चर्चेत आले आहेत. कैसरगंजचे खासदार असलेल्या ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंकडे उत्तर भारतीयांच्या माफीची मागणी केली आहे.

राज ठाकरेंना आव्हान देणारे ब्रिजभूषण सिंह हे भाजपतील मोठे नेते आहेत, त्याबरोबर त्यांचं माजी पंतप्रधान आणि भाजपचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी जवळचे संबंध होते.

ब्रिजभूषण यांना १९९६ मध्ये जेव्हा टाडा कायद्याखाली अटक करण्यात आली होती आणि दिल्लीतील तिहार तुरुंगात ठेवण्यात आलं होतं तेव्हा पंतप्रधान असलेल्या वाजपेयींनी पत्र पाठवून त्यांना दिलासा दिला होता.

३० मे १९९६ रोजी तिहारमध्ये असलेल्या खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटल बिहारी वाजपेयींनी पत्र लिहिलं होतं.

या पत्रात वाजपेयींनी लिहिलं होतं की, "प्रिय, ब्रिजभूषण जी, सप्रेम नमस्कार. आपल्याबद्दल माहिती मिळाली. पुन्हा नव्याने जामीनासाठी प्रयत्न करावा लागेल."

"आपण हिंमत हरू नका. चांगले दिवस राहिले नाहीत, तसेच वाईट दिवसही राहणार नाहीत. आजन्म कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या सावकरांचं स्मरण करा"

"वाचन करा. गाणी ऐका. आनंदी रहा. मी लवकरच येईन. हिंमत ठेवा. 'बिसारिये ना हरि को नाम, जाहि विधी राखे राम, ताहि विधि रहिए", असं वाजपेयींनी या पत्रात म्हटलं होतं.

केंद्रात १३ दिवसांचं सरकार आलं होतं, त्यावेळी वाजपेयींनी हे पत्र लिहिलं होतं. तुरूंगात असणाऱ्या ब्रिजभूषण सिंह यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही चिठ्ठी त्यांनी पाठवली होती.

ब्रिजभूषण शरण सिंह यांनी १९९१ मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली होती. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी तब्बल १ लाख १३ हजार मतांनी विजय मिळवला होता.

बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी ज्या ४० लोकांना आरोपी करण्यात आलं होतं. यात एक नाव ब्रिजभूषण शरण सिंह यांचंही होतं. सीबीआयने सर्वात आधी त्यांनाच अटक केली होती.