Covid 19 Symptoms : डेल्टा आहे की ओमिक्रॉन... कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर कसं ओळखायचं?

मुंबई तक

देशात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारंही सतर्क झाली आहेत. सध्या आरोग्य यंत्रणा देशातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

गेल्या दोन वर्षांच्या काळात कोरोनाचे वेगवेगळे व्हेरियंट आलेले असल्यानं त्यांच्या लक्षणांमध्ये काही प्रमाण फरक आहे. त्यामुळे कोरोनाच्या नेमक्या कोणत्या व्हेरियंटचा संसर्ग झाला, हे ओळखणंही महत्त्वाचं बनलं आहे.

कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन व्हेरियंटमधील फरक स्पष्ट करणारा एक अभ्यास आता समोर आला आहे. यात दोन्ही व्हेरियंटमध्ये काही वेगवेगळी लक्षणं असल्याचं आढळून आलं आहे.

हा अभ्यास वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध जर्नल असलेल्या द लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झाला आहे. ZOE कोविड ट्रॅकिंग अॅपच्या डेटाच्या आधारावर हा अभ्यास करण्यात आला आहे. यात लक्षणांच्या आधारावर कोरोनाच्या दोन्ही व्हेरियंटमधील फरक समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

संशोधकांनी अभ्यासासाठी डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग झालेल्या ४,९९० रुग्णांची आणि इतक्याच ओमिक्रॉन बाधित रुग्णांची निवड केली. या रुग्णांमध्ये दिसून आलेल्या लक्षणांची तुलना केली. नाक वाहणं आणि डोके दुःखी लक्षणं दोन्ही व्हेरियंट्समध्ये समान आढळून आली.

दोन्ही व्हेरियंटमध्ये काही वेगवेगळी लक्षणंही आढळून आली. अभ्यासासाठी निवडण्यात आलेल्या डेल्टा संक्रमित ५२.७ टक्के रुग्णांमध्ये वास न येण्याचं लक्षणं आढळून आलं. तर ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या १६.७ टक्के रुग्णांमध्येच हे लक्षणं आढळून आलं.

या अभ्यासात ओमिक्रॉनचा सर्वमान्य लक्षणं आढळून आलं, ते म्हणजे घशात खवखव होणे. हे लक्षणं डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या तुलनेत ओमिक्रॉन झालेल्या रुग्णांमध्ये जास्त आढळून आलं.

ओमिक्रॉन घशापासून वरच्या श्वसन यंत्रणेपर्यंत मर्यादित राहतो. त्याचा शरीराच्या इतर अंगावर परिणाम होत नाही. डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या खूप कमी आहे.

डेल्टा झालेल्या २.६ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. तर हेच प्रमाण ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये १.९ टक्के होतं. ओमिक्रॉनची लक्षणं डेल्टाच्या तुलनेत दोन लवकर कमी होऊन जातात.

ओमिक्रॉनच्या तुलनेत याचाच BA.2 हा उप विषाणू (सब व्हेरियंट) जास्त संसर्गजन्य असल्याचं सांगितलं जात आहे. याला स्टिल्थ ओमिक्रॉनही म्हटलं जात आहे.

मूळ ओमिक्रॉनच्या तुलनेत हा नवा सब व्हेरियंट ६० टक्के अधिक संसर्गजन्य असल्याचं CDC ने म्हटलं आहे. अधिक संसर्गजन्य असला, तरी या व्हेरियंटला मूळ ओमिक्रॉनच्या तुलनेत इतकं गंभीर मानलं जात नाही. मात्र, काही तज्ज्ञांच्या मते हा विषाणू बराच काळ शरीरात राहतो.

या अभ्यासात सहभागी झालेल्या युनिव्हर्सिटी ऑफ एक्सेटर मेडिकल स्कूलचे वरिष्ठ प्रा. डॉ. डेव्हिड स्ट्रेन यांनी द गार्डियनला सांगितलंत की, 'BA.2 चा संसर्ग झालेले रुग्ण जास्त काळ रुग्णालयात राहत आहेत. स्टाफमध्येही बऱ्याच कालावधीपर्यंत ते पॉझिटिव्ह आढळून येत आहेत.

FDA संशोधकांच्या मते बुस्टर डोसमुळे कोरोना विरुद्ध अॅण्टीबॉडीज वाढतात, मात्र त्यांचं प्रमाण कमी असतं. असं असलं तरी बुस्टर डोसमुळ गंभीर आराजांपासून संरक्षण मिळतंय. नवीन व्हेरियंट्स येण्यापूर्वी लसीमध्ये संशोधन करण्याचं काम सुरू करायला हवं.