Hanuman Chalisa Row : नवनीत राणा, रवी राणांच्या जामीनावरुन न्यायालयात काय घडलं?

मुंबई तक

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा जामीन रद्द करण्यासाठी मुंबई पोलिसांनी आज मुंबईतील विशेष न्यायालयात धाव घेतली.

खासदार नवनीत राणा यांनी लिलावती रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल विधान केलं होतं.

नवनीत राणा यांनी केलेल्या काही विधानं अधोरेखित करत मुंबई पोलिसांनी आज विशेष सत्र न्यायालयात धाव घेतली.

अर्ज दाखल करताना मुंबई पोलिसांकडून न्यायालयाने जामीन देताना दिलेल्या आदेशाचा दाखला दिला. त्याबरोबर न्यायालयाच्या आदेशाचं कशा पद्धतीने राणांकडून उल्लंघन झालं आहे, अशी भूमिका मांडतांना पोलिसांनी त्यांच्या काही विधानांचा दाखला दिला.

नवनीत राणांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्दे अधोरेखित करत पोलिसांनी त्यांचा जामीन अर्ज रद्द करण्याची मागणी केली.

मुंबई पोलिसांच्या वतीने सरकारी वकील प्रदीप घरत यांनी बाजू मांडली. 'नवनीत राणा यांनी तुरुंगातून बाहेर आल्यापासून सलग दुसऱ्यांदा न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केलं आहे. राणा दाम्पत्याला तुरुंगात पाठवून मुख्यमंत्र्यांनी अधिकारांचा गैरवापर केलाय का? त्यांचं असं बोलणं योग्य आहे का?,' प्रश्न घरत यांनी उपस्थित केला.

'त्यांनी (राणा दाम्पत्य) न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला आहे. ते मुख्यमंत्री आणि शिवसेना नेत्या जाहीरपणे धमकी देत आहेत.'

'खासदारांना पोलीस वा तुरुंगात त्रास झालाय, तर त्यांनी न्यायालयात जावं. त्यासाठी माध्यमांशी बोलण्याची गरज नाहीये. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करायला हवा,' असं म्हणत घरत यांनी अजामीनपात्र वॉरंट काढण्याची मागणी केली.

युक्तिवादानंतर न्यायालयाने नवनीत राणा आणि रवी राणा यांना खुलासा करणारी नोटीस बजावली आहे. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी ही नोटीस बजावली आहे.

'तुमच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट का काढण्यात येऊ नये,' असा सवाल न्यायालयाने नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना केला. न्यायालयाने कारणे द्या नोटीसवर खुलासा करण्याचे निर्देश दिले आहे. या याचिकेवरील सुनावणी आता १८ मे रोजी होणार आहे.