Rohit Sharma : 'मी पूर्ण जबाबदारी घेतो'; मुंबईच्या पराभवाच्या मालिकेमुळे रोहित निराश

मुंबई तक

तब्बल पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावणारा मुंबई इडियन्सचा संघ सध्या विजयासाठी धडपडताना दिसत आहे. शनिवारी लखनौविरुद्ध झालेल्या सामन्यातही मुंबईच्या पदरी पराभव पडला.

१५व्या हंगामातील मुंबईचा हा सहावा पराभव ठरला आहे. मुंबईला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नसून, शनिवारच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल भूमिका मांडली.

लखनौविरुद्धचा सामना संपल्यानंतर रोहित शर्मा निराश झालेला दिसला. त्याने पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली.

रोहित म्हणाला, "चुकीचं काय होत आहे हे जर मला कळलं असतं, तर मी त्या दुरुस्त केल्या असत्या. पण असं काही होत नाहीये."

"मी पूर्ण जबाबदारी स्वीकारतो. मी अनुभवाचा पूर्णपणे वापर करेन आणि स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न असेल," असं रोहितने सांगितलं.

मुंबई इडियन्सचं नेतृत्व असलेल्या रोहित शर्माची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

लखनौविरुद्ध पराभव झाल्यानंतर रोहित म्हणाला, "भागीदारी न करणं आमच्यासाठी नुकसानीचं ठरलं. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, पण केएल राहुलच्या फलंदाजीसमोर ते सपशेल अपयशी ठरले."

"एका खेळाडूमुळे सामना जिंकू शकत नाही. इतर खेळाडूंनाही आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करावी लागेल. विरुद्ध संघाचंही कौतूक करायला हवं. राहुलने कौतुकास्पद खेळी केली."

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात मुंबई इंडियन्सची या हंगामातील सर्वात निराशाजनक कामगिरी राहिली आहे.

मुंबई इंडियन्सने ६ सामने गमावले असून, यापूर्वी अशी स्थिती दिल्ली डेअर डेव्हिल्स (२०१३), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (२०१९) या संघाचीही झाली होती.