'हे माझं नाटक नाही'; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

मुंबई तक

मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदेंना समोर येऊन सांगा, मी लगेच राजीनामा देतो, असं स्पष्ट केलं. त्यामुळे आता शिंदे आणि बंडखोरांच्या हाती आता ठाकरे सरकारचा फैसला असणार आहे. आज उद्धव ठाकरेंनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी एकदाच एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं.

"गेल्या काही दिवसांपासून जे मुद्दे प्रसारमाध्यमांतून तुमच्यापर्यंत येत आहेत, त्यासंदर्भात बोलण्यासाठी मी आलोय. ही शिवसेना बाळासाहेबांची आहे का? शिवसेना कोण चालवतंय. शिवसेनेनं हिंदुत्व सोडलंय का? मुख्यमंत्री भेटत का नाही. मुख्यमंत्री म्हणजे मी का भेटत नव्हतो. तर शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्यानंतरचे दोन-तीन महिने फार विचित्र होते. मी कुणाला भेटू शकत नव्हतो. भेटणं शक्य नव्हतं. त्या काळात मुख्यमंत्री भेटत नाही, हा मुद्दा बरोबर आहे."

"त्यानंतर मी आता भेटायला सुरूवाती केलीये. बरं असंही नाहीये की मी भेटत नव्हतो. मी माझी पहिली कॅबिनेट मीटिंग रुग्णालयातील बाजूच्या खोलीतून घेतली होती."

"शिवसेना म्हणाल तर शिवसेना आणि हिंदुत्व एकमेकांशी जोडले गेलेले शब्द आहेत. शिवसेना कदापि हिंदुत्वापासून आणि हिंदुत्वापासून दूर होऊ शकत नाही. कारण बाळासाहेब ठाकरेंनी कानमंत्र दिलाय की, हिंदुत्व हा आमचा श्वास आहे."

"गेल्या आठ-पंधरा दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार, खासदार आणि मंत्री जाऊन आले. हिंदुत्वासाठी कुणी कुणी काय काय केलं. हे आता बोलण्याची वेळ नाही. पण हिंदुत्वावर विधानसभेत बोलणारा पहिला मुख्यमंत्री असेन."

"मग नेमकं झालंय काय. ही शिवसेना कुणाची आहे. काहीजण असं भासवण्याचा प्रयत्न करत आहेत की ही काही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. ठिके. बाळासाहेबांची शिवसेना आणि आताची शिवसेना यात काय फरक आहे. असं मी काय केलंय की शिवसेना बाळासाहेबांच्या विचारापासून दूर जात चालली आहे."

"त्यावेळी जे विचार होते, तेच आपण पुढे नेत आहोत. नंतर २०१२ मध्ये बाळासाहेब आपल्यातून गेले. २०१४मध्ये आपण एकटं लढलो. तेव्हाही आपण हिंदूचं होतो. आताही हिंदूच आहोत, उद्याही हिंदूचं राहणार आहोत. मुद्दा, विचार तोच राहणार आहे. २०१४ साली लढलेली जी शिवसेना होती, जिने प्रतिकुल परिस्थितीत ६३ आमदार निवडून आणले. त्यातील काही जे मंत्री झाले, ती बाळासाहेबांनंतरची शिवसेना होती."

"गेली अडीच वर्षे मी स्वतः मुख्यमंत्री आहे. माझ्यासोबत मंत्रिमंडळातील सहकारी आहेत, ते सुद्धा त्याच बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना पाहिजे म्हटलं जातंय मग मधल्या काळात जे मिळालं, ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेनं दिलं. हे कृपा करून लक्षात ठेवा."

"शिवसेनेचे काही आमदार गायब असल्याची सर्वांना कल्पना आहे. आधी सुरतमध्ये गेले, मग आता म्हणतात की गुवाहाटीला गेले. आता त्यातील काही आमदारांचे फोन येताहेत की आम्हाला इकडं आणलं गेलंय. आम्हाला परत यायचंय. इथे असलेल्या आमदारांचेही फोन येताहेत. पण मला यात जायचं नाही."

"कालपरवा एक निवडणूक झाली. त्या निवडणुकीच्या आधी हॉटेलमध्ये शिवसेनेची बैठक झाली. ज्यांना आपण आपलं मानतो, त्यांना सुद्धा आपल्या एकत्र ठेवावं लागतं. बाथरुमला गेलं तरी संशय. लघुशंकेला गेला, तरी शंका ही कुठली लोकशाही."

"मला कशाचाही अनुभव नव्हता. मी इच्छेपेक्षा जिद्दीने काम करणारा माणूस आहे. इच्छा असो वा नसो, पण एकदा जबाबदारी अंगावर आली की, ती जबाबदारी मी पूर्ण जिद्दीने पार पाडण्याचा प्रयत्न करतो. त्याच जिद्दीने मी शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन पूर्ण करणारच, अशा निश्चय करून रंणागणात उतरलो."

"वेगळा मार्ग पत्करावा लागला. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जावं लागलं. तिन्ही पक्षांच्या बैठकीत शरद पवार यांनी सांगितलं की, उद्धवजी तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. तुम्ही नसाल, तर सरकार पुढे चालणं कठीण आहे."

"मी म्हणालो, 'पवारसाहेब मस्करी करताहेत का? मी महापालिकेतही महापौर जिंकल्यानंतर अभिनंदन करायला जातो. साधा महापालिकेत न गेलेला माणूस मुख्यमंत्री कसा होणार?' तर ते म्हणाले, तुम्हाला हे करावंच लागेल."

"शरद पवार, सोनिया गांधी यांनी माझ्यावर विश्वास टाकला. कोणताही अनुभव नसलेला माणूस बसवणं, यात फक्त स्वार्थ नाही. राजकारण कुठेही वळण घेऊ शकतं. पण त्या वळणालाही अर्थ असला पाहिजे."

"आजपर्यंत सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं. प्रशासनानेही खूप सहकार्य केलं. आज मला दुःख कशाचं झालंय, धक्का बसलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाली की आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नको, तर तो त्यांचा विचार आहे. सत्तेच्या तडजोडीसाठी एकत्र आलो होतो."

"माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही. जे काही बोलायचं आहे ते समोर येऊन बोला, आडून आडून का बोलायचं आहे. मला वेदना होत आहेत का? होय मला वेदना होत आहेत. जे आमदार समोर नाहीत त्यांनी समोर यावं मी राजीनामा देतो. लाचारीचा प्रसंग माझ्यावर आलेला नाही. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसेना प्रमुखांना जोडलेला शिवसैनिक आहे, तोपर्यंत मी कोणत्याच आव्हानाला घाबरत नाही. आज मी माझ्या शिवसैनिकांनाही हे आवाहन करतो आहे."

"तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको तर मी सोडायला तयार. आज मी वर्षावर मुक्काम हलवतोय. पण हे समोर येऊन बोला."

MandarDeodhar

"कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ या म्हणीची गोष्ट. ज्याने घाव घातल्या जाताहेत त्याच्या वेदना अधिक. शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका. मला कोविड झालाय मी राजीनामा देतो तुम्ही येऊन घेऊन जा."

"हे काय मोठे आव्हान आहे. शिवसैनिक सोबत तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन. शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. संकाटाला सामोरा जाणारा शिवसैनिक. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी."

"एकदा ठरवू या समोर या सांगा आम्हाला संकोच वाटतोय हे स्पष्ट सांगा. मी सोडायला तयार. आयुष्याची कमाई पद नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई."

"माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण. संख्या कशी जमवता हे नगण्य. मी आपला मानतो त्यांनी मला सांगाव मी मुख्यमंत्री पद सोडतो. एकच सांगतो तुमचे प्रेम असे ठेवा."