नॅशनल हेराल्ड प्रकरणाचे पडसाद आज राज्यातही उमटले. नॅशनल हेराल्ड प्रकरणात गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणात ईडीकडून राहुल गांधी यांची तीन दिवस चौकशी करण्यात आली. उद्या (१७ जून) पुन्हा चौकशी केली जाणार असून, काँग्रेस याविरोधात आक्रमक झाली आहे.
नॅशनल हेराल्डशी निगडित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावलेलं आहे. काल सलग तिसऱ्या दिवशी ईडीच्या अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांची चौकशी केली.
राहुल गांधी यांच्याविरोधात सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईविरुद्ध काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच्याच निषेधार्थ काँग्रेसने राजभवनाला घेराव घातला.
मैं भी राहुल, ईडीची कारवाई, केंद्राचा निषेध करणारे फलक घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाई जगताप, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड यांच्यासह अनेक काँग्रेस नेते, पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.
सकाळी काँग्रेस कार्यकर्ते राजभवनाच्या बाहेर जमले. त्यानंतर गर्दी वाढतच गेली. काँग्रेसच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राजभवन परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आलेला होता.
नाना पेटोल यांच्या नेतृत्वाखाली राजभवनाला घेराव घालण्यात आला. काँग्रेस आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावले होते.
राजभवनाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नंतर ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले.