
मुंबई : येत्या २० तारखेला राज्यात विधानसभेच्या १० जागांसाठी मतदान होणार आहे. १० जागांसाठी ११ उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे या निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे. भाजपप्रणित सहावे उमेदवार असलेले सदाभाऊ खोत यांनी शेवटच्या क्षणी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता खरी लढत ही भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात होणार आहे. सदाभाऊंनी अर्ज मागे घेतल्याने आता राजकीय नेते टीका करु लागले आहेत. राष्ट्रवादीचे विधान परिषदचे आमदार अमोल मिटकरी यांनी सदाभाऊंवरीत टीका केली आहे.
अमोल मिटकरी ट्विट करत म्हणाले ''सदाभाऊ उतारवयात आराम करता यावा म्हणुनच फडणवीसांनी आपणास विश्रांती घ्यायचा सल्ला दिलाय, मात्र आपण माघार घेतली यावर विश्वासच बसत नाही. भाऊ त्या फडणिसांना सांगा, म्हणावं, "म्या एक पाऊल मागं आलुया म्हंजी थकलो नाय. आणखी दोन पावलं माग येऊन सन्या गुमान बसल."
दरम्यान, विधान परिषदेची निवडणूक राज्यसभा निवडणुकीसारखी रंगतदार होणार आहे. सदाभाऊ खोतांसोबतच राष्ट्रवादीच्या शिवाजीराव गर्जेंनी देखील आपला अर्ज मागे घेतला आहे. सदाभाऊ खोतांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ''पक्षात सर्वांशी चर्चा करून सदाभाऊंचा अर्ज मागे घेण्यात आला आहे'' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
भाजपचे पाचवे उमेदवार असलेले प्रसाद लाड यांना निवडणून आणण्यासाठी भाजपला कसरत करावी लागणार आहे. कारण भाजपकडे पाचव्या जागेसाठी कोट्यापेक्षा कमी मतं शिल्लक राहणार आहेत. याबाबात देवेंद्र फडणवीस म्हणाले की ही निवडणूक सोपी बिलकूल नाहीये. आम्ही सर्व गणितं आखलेली आहेत. पाचवा उमेदवार आमचाच निवडून येईल.
विधान परिषदेसाठीचे उमेदवार
भाजप: उमा खापरे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड, राम शिंदे.
राष्ट्रवादी: रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे
काँग्रेस: चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप
शिवसेना: सचिन अहिर, आमश्या पाडवी