आंबेगाव तालुक्यातील चिंचोडी गावच्या हद्दीत ओढ्यात बिबट मादीचे दोन बछडे मृत अवस्थेत आढळले आहेत.
शेतकरी दिलीप भिमाजी गव्हाणे (रा.लांडेवाडी) यांनी खंडू अमृता शेवाळे (रा. चिंचोली) यांच्या शेताशेजारी असलेल्या ओढ्यामध्ये दोन बिबट बछडे मृत अवस्थेत पाहिले.
दिलीप गव्हाणे यांनी याची माहिती वनविभागाला दिली होती. वन विभागाचे वनपाल संभाजीराव गायकवाड, रेस्क्यू टीम सदस्यांनी घटनास्थळी जाऊन मृत बछडे ताब्यात घेतले.
बिबट्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. या बछड्यांवर मोठ्या नर जातीच्या बिबट्याने हल्ला करून ठार केले असावे, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.
मृत बछड्यांना नंतर अवसरी घाट वन उद्यान येथे आणून सहायक वनरक्षक भिसे, वनपाल एल एल गायकवाड, पंच, रेस्क्यू टीम सदस्य यांच्या उपस्थितीत बछड्यांच्या शरीराच्या सर्व अवयवांचे अग्नी दहन केले.