मातोश्री हा शब्द महाराष्ट्रातील राजकारणासाठी चांगलाच परिचयाचा आहे. मागील काही दशकांपासून महाराष्ट्रातील सत्ताकारणात महत्त्वाचं स्थान असलेल्या शिवसेनेची सूत्रं जिथून हलतात, तीच ही वास्तू! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेल्या या तीन मजली इमारतीसमोर अनेक गगनचुंबी इमारतीही खुज्या ठरतात.
१९८० च्या दशकात बाळासाहेब ठाकरे हे वांद्रे पूर्वमधील कलानगरमध्ये असलेल्या मातोश्री बंगल्यात राहायला आले होते. १९९५ मध्ये जेव्हा शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं, तेव्हा मातोश्री बंगल्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या. ग्राऊंड फ्लोरसह तीन मजले उभारण्यात आले. मातोश्री बंगल्यातील जागा कमी पडत असल्यानं समोरच मातोश्री-२ बंगला उभारण्यात आला.
उद्धव ठाकरे हे कुटुंबासह कलानगरमधील जुन्याच मातोश्री बंगल्यात राहतात. मातोश्री बंगला १० हजार चौरस फूट जागेवर उभारण्यात आलेला आहे.
मातोश्रीमधील एका खोलीत बाळासाहेबांची प्रतिमा आहे. २०१९ मध्ये मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम याच खोलीत जाऊन बाळासाहेबांचे आशीर्वाद घेतले होते.
गेल्या चार दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात वर्चस्व असलेलं ठाकरे कुटुंब सुरूवातीपासूनच मातोश्रीमध्ये राहत नव्हतं. मातोश्रीत येण्यापूर्वी ठाकरे राहायचे ते मुंबईतील मिरांडा चाळीत. ही चाळ दादरमध्ये आहे.
असं सांगितलं जात की मातोश्री बंगल्याची किंमत जवळपास ८० कोटी रुपये इतकी आहे. मातोश्रीचा ग्राऊंड फ्लोर बाळासाहेबांनी पक्षाच्या सामाजिक राजकीय कामासाठी ठेवला होता.
आता उद्धव ठाकरे ११ कोटी ६० किंमत असलेल्या जागेवर मातोश्री-२ बनवत आहे. ही जागा २०१६ मध्ये खरेदी करण्यात आली होती. मातोश्री-२ आठ मजल्यांची असणार आहे. यात ३ ड्युप्लेक्स फ्लॅट, स्टडी रुम, होम थिअटर, स्वीमिंग पूल, हायटेक जीम आणि एक मोठा हॉल असणार आहे.