संजय राठोड यांच्या राजीनाम्याबद्दल शनिवारी रात्रीपासून हालचालींना सुरुवात झाली होती. रविवारी सकाळी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो पोस्ट करत राजधर्माचे पालन याविषीय एक सूचक संदेश लिहीला. ज्यानंतर आज संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार या चर्चांनी पुन्हा एकदा वेग घेतला.
सकाळी संजय राठोड आपल्या मुंबई येथील निवासस्थानावरुन सपत्नीक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्याकडे निघाले. यावेळी पत्रकार संजय राठोडांची प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी हजरच होते. पण राठोडांनी यावेळी अधिक काहीही बोलण्यास नकार दिला. यावेळी त्यांच्या पत्नीची असणारी उपस्थिती चर्चेचा मुद्दा ठरत होती.
दरम्यानच्या काळात विरोधी पक्ष नेत्यांची एक बैठक पार पडली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारवर दबाव वाढवला.
दरम्यान दुपारनंतर संजय राठोड आपल्या पत्नीसह वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहचले. यानंतर राठोड यांनी आपला राजीनामा वाचवण्याची खूप धडपड केली. पण विरोधकांकडून वाढत असलेला दबाव आणि समाजमाध्यमांमध्ये येणाऱ्या प्रतिक्रीया यामुळे मुख्यमंत्री राजीनाम्यावर ठाम राहिले.
अखेरीस संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांना सोपवला. आपल्यावर गलिच्छ आरोप होत असून चौकशी पूर्ण होईपर्यंत आपण पदावरुन दूर राहणं योग्य असल्याचं म्हणत राठोड यांनी आपला राजीनामा दिला. वर्षा बंगल्याबाहेर आल्यानंतर राठोड यांनी शिवसेना खासदार अनिल देसाई आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत आपल्या राजीनाम्याविषयी पत्रकारांना माहिती दिली.
दरम्यानच्या काळात पुजा चव्हाणच्या कुटुंबाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या मुलीची व समाजाची होणारी बदनामी थांबवा अशी मागणी केली. चव्हाण कुटुंबाने लिहीलेल्या पत्राचा नंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत उल्लेख करत विरोधकांना टोला लगावला.
त्याआधी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची बातमी आल्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधत राठोड यांच्यावर FIR दाखल करण्याची मागणी केली.
संध्याकाळी साडेसहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राठोड प्रकरणावरुन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना खडे बोल सुनावले. व्यक्ती कितीही मोठा असला तरीही त्याच्यावर कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई होईल असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. एखाद्याला अडकवायचच आहे असा तपास होणंही योग्य नसल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला.