संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आज असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झालं.
आज पालखीचा पहिला मुक्काम नाशिकमधील सातपूरमध्ये होणार आहे.
मुखी हरिनामाचा जप, टाळ मृदंगाचा गजर करत वारकरी लेकुरवाळ्या विठ्ठलाच्या भेटीला जातात.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे आषाढीची वारी चुकली. दरवर्षीची विठू माऊलीची भेटही हुकली. त्यामुळे यंदा पंढरपुरला जाण्यासाठी वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
वारकऱ्यांनी आज त्रांबकेश्वरमध्ये दाखल होत पालखी बरोबर मार्गक्रमण सुरू केलं.
त्र्यंबकेश्वरध्ये निवृत्तीनाथांचा आशीर्वाद घेवून कुशावर्त स्नान झाल्यावर पालखी माऊलीच्या भेटीच्या ओढीने पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली.
संत निवृत्तींनाथ महाराज पालखी सोहळा हा नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर अशा तीन जिल्ह्यांतून जातो. नेहमीप्रमाणेच यावर्षीदेखील पालखीचे २६ मुक्काम होणार आहेत.
२७ व्या दिवशी पालखी पंढरपुरात पोहोचणार असून, १ जुलैला पालखीचं कर्जतजवळ धांडे वस्ती येथे उभे रिंगण होणार आहे.
पालखीत दोन गोल रिंगण होणार असून, ९ जुलै रोजी वाखरी सोहळा संपन्न होणार आहे.
याठिकाणी सर्व संतांच्या दिंड्या एकत्र येणार असून, त्यानंतर पंढरपूर प्रवेश सोहळा सुरू होईल. १० जुलै रोजी आषाढी एकादशी यात्रोत्सव आहे. पालखी मुक्काम आषाढ पौर्णिमेच्या १३ जुलैपर्यंत उत्सव आहे. दिंडी सत्ताविसाव्या दिवशी पंढरपुरात पोहोचेल. त्यानंतर चार मुक्कामानंतर पंढरपूर वारी करून पालखी त्र्यंबकेश्वरकडे माघारी फिरणार आहे.